मुंबई, 10 जुलै : दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटने जेरबंद केलं आहे. ही टोळी घरफोडी करताना कॉन्फरन्स कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात असायची, अशी माहिती समोर आली आहे. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापुरात घरफोडीच्या घटना वाढल्यानं गुन्हे शाखेनं या घटनांचा समांतर तपास सुरू केला होता. यादरम्यान झुल्फिकार उर्फ राजू हसमत अली इंद्रिसी आणि ब्रिजेशकुमार जगतपाल गुप्ता हे दोघे गुन्हे शाखेच्या हाती लागले.
यात चौकशी दरम्यान त्यांनी तब्बल 29 घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे. एखादं बंद घर हेरल्यानंतर या टोळीचे चार जण सँट्रो कार घेऊन घरफोडी करायला जायचे. त्यापैकी दोघे प्रत्यक्ष घरफोडी करायचे, तर एक जण इमारतीच्या आवारात आणि एक जण कारमध्ये बसून लक्ष ठेवायचा.
यादरम्यान हे सगळे कॉन्फरन्स कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात असायचे. चोरी करून झाल्यावर लगेच कारने ते तिथून पसार व्हायचे. अखेर गुन्हे शाखेनं या घरफॉड्यांचा छडा लावलाय. अटक केलेला आरोपी झुल्फिकार इद्रिसी हा सराईत चोरटा असून त्याच्यावर यापूर्वी मुंबई, नवी मुंबईसह राज्यभरात २० गुन्हे दाखल आहेत. ऑर्थर रोड आणि तळोजा कारागृहातही तो जेरबंद होता. तर नुकताच ठाणे कारागृहातून तो जामिनावर बाहेर आला होता.
या टोळीकडून गुन्हे शाखेनं सँट्रो कारसह तब्बल साडेचार किलो सोनं हस्तगत केलंय. या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours