मुंबई, 09 जुलै : आजपासून पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 12 जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस तर उत्तर, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विदर्भात आणि इतर ठिकाणी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तर पूर्व विदर्भातही 9 आणि 10 जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
दक्षिण आणि उत्तर कोकणात आजपासून 12 तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. तसंच उत्तर-मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मराठवाड्यात मात्र काही भागातच मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पूर्व आणि विदर्भात मात्र 8 जुलैला जोरदार तर 9 आणि 10 जुलैला काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात आज जोरदार पाऊस होणार असल्यानं अधिक काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईकरांचा कालचा रविवार जोरदार पावसात धुऊन निघाला. सकाळपासून पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळतोय. त्यामुळे अनेक सखल भागांचे जलाशय झालेले पाहायला मिळाले. हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलंय. तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही पावसाच्या दमदार बॅटिंग सुरु आहे. मात्र रविवार असल्यानं अनेकांनी घरात बसूनच पाऊस एन्जॉय केला.
पण दरम्यान मुंबईसह, पालघर ठाण्यात उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे अति महत्त्वाचं काम असेल तरच लहान मुलांना घेऊन बाहेर पडा अन्यथा पाण्याचा खेळ जीवावर बेतू शकतो.
Post A Comment:
0 comments so far,add yours