मुंबई :   मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजासाठी अनेक घोषणा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा संघटना सरकारी योजना अंमलबजावणी यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली समिती केली जाणार आहे. यात मराठा संघटना पदाधिकारी समवेत प्रशासकीय अधिकारी असतील. यापुढे मराठा युवकांना बँकांकडून दहा लाख कर्ज घेताना राज्य सरकार बॅक गॅरिंटी देईल असा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुंबईत झाली. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदस्य विनोद तावडे, एकनाथ शिंदे, सदानंद मोरे आणि संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

राज्य सरकारच्या मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीत घेतलेले निर्णय -

- मराठा समाजाासाठी योजनांची अंमलबजावणीसाठी आता २० जणांची जिल्हा निहाय समिती जिल्हाधिकारी अध्यक्ष खाली समिती असेल, त्यात दहा अधिकारी तर उर्वरित दहा यात मराठा संघटना प्रतिनिधी असेल. ही समिती विद्यार्थी फी, वस्तिगृह, कर्ज याचा आढावा घेत राहील.

- बँका दहा लाख कर्ज देताना गँरिटी देताना अडचण येते असे समोर आले, त्यामुळं बँकांनी आता कर्ज देताना कोलॅटरेल किंवा माॅडगेज मागायचे नाही, सरकार कर्जाची गॅरिन्टी राहील, मराठा समजातील मुलांना कर्ज घेताना अडचण येणार नाही.

- प्रत्येक जिल्हयात सरकार वापरात नाही ती इमारत ताब्यात घेत हाॅस्टेल सुरू केले जातील. वस्तीगृह मिळालेच नाही त्यांना दहा हजार रूपये मदत विद्यार्थीना मिळेल.

- पीएचडी करू पाहणारे विद्यार्थीना देशात अथवा परदेशात फेलोशिप मिळेल.

- स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात केंद्र सुरू केले जाईल.

दरम्यान, राज्यभर पेटलेलं आंदोलन आरक्षणासाठी नव्हे तर श्रेयासाठी सुरू आहे अशा शब्दात नारायण राणेंनी हिंसक आंदोलनावर प्रहार केलाय. न्यूज18  लोकमतला दिलेल्या बेधडक मुलाखतीत अनेक विषयांवर परखड मतं मांडली. तर टिकेल असं आरक्षण फक्त भाजप देऊ शकतं याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. याशिवाय मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या उपसमितीची आज बैठक पार पडली. ज्यात मराठा समाजासाठी मेगाप्लान जाहीर करण्यात आलाय.

तर मराठा समाजाला आरक्षण हेच सरकार देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला  दिलीय. मुंबईत राजाराम महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

आंदोलनाचा वणवा पेटलेलाच

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला आंदोलनाचा वणवा दिवासगणिक पेटत जातोय. लातूर जिल्ह्यातील औसा तहसील समोर मराठा आरक्षणच्या मागणीसाठी युवकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आरक्षणची मागणी करत, घोषणा देत दोन युवकांनी अंगावर रॉकेल आतून घेतलं. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संतप्त तरूणांना रोखलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

बीड तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आणखी एका तरुणानं आत्महत्या केलीय. बीड जिल्ह्यातील विडा या गावातील अभिजित बालासाहेब देशमुख या ३५ वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला अभिजित देशमुखनं नैराश्यातून हे टोकाचं पाऊल उचललं. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीत त्यांनी आपल्या औषध-गोळ्यांचा खर्च, बँकेचे कर्ज आणि मराठा आरक्षणामुळे मी जात आहे असं लिहीलं होतं. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून याचा तपास करत आहेत.

नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

राज्यातल्या मराठा आंदोलनाची धग आठवडाभरानंतही कायम आहे. राज्याच्या अनेक भागात मराठा क्रांतीमोर्चाकडून आंदोलनं करण्यात येताहेत. आज नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. मंगळवारी नरसी मुखेड रोडवर एस टी बस जाळण्यात आली नांदेडहुन मुखेडकडे प्रवासी घेऊन जाणारी बस  आलुवडगाव फाट्याजवळ थांबवण्यात आली. प्रवाशांना खाली उतरवून बस पेटवून देण्यात आली. दुसऱ्या घटनेत उमरीहुन नांदेडला येणारी एस टी बस फोडण्यात आली. या बसमध्ये शालेय विद्यार्थी होते. विद्यार्थ्याना उतरवून आंदोलकानी बसवर तुफान दगडफेक केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours