मुंबई, 04 आॅगस्ट : या वर्षी पोर्तुगालला फिजिक्स आॅलिंपियाड पार पडलं. आणि यात 5 भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केलंय. होमी भाभा सेंटर फाॅर सायन्स एज्युकेशनमध्ये या पाच विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण दिलं गेलं. आणि मग या आॅलिंपियाडसाठी पाठवलं गेलं. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्राध्यापकांची टीम होती.  शिरीष पाठारे  होमी भाभामध्येच सायंटिफिक आॅफिसर आहेत. 1999पासून ते या संस्थेत काम करतायत. एवढं मोठं शिवधनुष्य त्यांनी कसं पेललं, हे न्यूज18लोकमतनं त्यांच्याशी बोलून समजून घेतलं.
शिरीष पाठारे सांगतात, 'आॅलिंपियाडमध्ये भारताकडून 1998पासून विद्यार्थी पाठवले गेलेत. जवळजवळ 70 ते 80 हजार मुलांमधून 300 ते 400 मुलं निवडली जातात. त्यांची परीक्षा घेतली जाते. त्यातून पुन्हा 35 ते 40 मुलांची निवड होते. होमी भाभा संस्थेत  14 दिवसांचा कँप असतो.' आॅलिंपियाडला जायचं म्हणजे मोठा गौरव असतो. तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करत असता.
यामध्ये काय शिकवलं जातं? पाठारे सांगत होते, ' मुलांना थिएरी आणि प्रॅक्टिकल्स दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. त्याचं पद्धतशीर प्रशिक्षण दिलं जातं. प्रयोग कसा करावा याची पूर्ण प्रॅक्टिस घेतली जाते. त्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. त्यात 3 थिएरी आणि 3 प्रयोगाची परीक्षा असते. त्यातल्या गुणांवरून 5 विद्यार्थी निवडले जातात.'
या वर्षी हे आॅलिंपियाड पोर्तुगालला झालं. 86 देशांमधले 396 विद्यार्थी या आॅलिंपियाडमध्ये सहभागी झाले होते.  या आधी इण्डोनेशिया, स्वित्झर्लंड इथेही झालं होतं. 2015ला ते मुंबईत झालं होतं. मुलांच्या या यशात शिरीष पाठारेंचा सिंहाचा वाटा आहे. खरं तर भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्सची आवड असणारे कमीच असतात. पण पाठारेंना ही गोडी 11वी-12वीतच लागली.
' भौतिकशास्त्राची आवड निर्माण होणं शाळेवर अवलंबून आहे. कसं असतं तुम्ही लहानपणी पाढे प्रेमानं शिकलात की मार खाऊन यावरच ही गोडी निर्माण होते.' पाठारेंनी सांगितलं. त्यांनी पहिलं लेक्चर 9वीत असताना घेतलं होतं. शाळेतल्या मुलांना त्यांनी भौतिकशास्त्राचे धडे दिले होते. नंतरचं शिक्षण रुपारेलमध्ये झालं. ते म्हणतात, 'तिथल्या शिक्षकांमुळे मला भौतिकशास्त्राची गोडी लागत गेली.' आणि पुढे शिक्षक बनून पुढच्या पिढीत ही गोडी रुजवत गेले.
शिरीष पाठारे फक्त आॅलिंपियाडसाठी मुलं घडवत नाहीत, तर ते प्रयोगशाळेसाठी लागणारी टेबलटाॅप उपकरणंही बनवतात. ते सांगतात, 'ही पद्धत सोपी नाही. मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी तयार मिळतात. पण त्या तयार मिळतात. मी  बाहेर फिरतो. लोकांशी बोलतो. मग त्यातून एक एक गोष्टी समोर येतात आणि मी उपकरणं बनवतो.' पाठारेंनी मायकलसन इन्टरफेरोमीटर बनवलं होतं. एरवी लाखाच्या घरात बनणारी उपकरणं पाठारे 3 ते 4 हजारांमध्ये बनवून देतात. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्याही भौतिकशास्त्र शिकणं आवाक्यात येऊ शकतं.
गेल्या वर्षी इन्डोनेशियाला आॅलिंपियाड झालं, तेव्हा पाठारे टीमसोबत गेले होते. जगभरातले विद्यार्थी तिथं आले असतात. पाठारे सांगतात, ' भारताकडे नेहमीच आदरानं आणि कौतुकानं पाहिलं जातं. नेहमीच चीन, तैवान आणि भारत यांनाच जास्त मेडल मिळतात.'
या वर्षी भारतानं 5 सुवर्णपदकं मिळवली. पवन गोयल, ले जैन, सिद्धार्थ तिवारी, भास्कर गुप्ता, निशांत अभंगी यांनी हे यश मिळवलंय. पण दर वर्षीच भारत 3 ते 4 सुवर्णपदकं, रजत पदकं मिळवतोच. इथे येणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरचं वातावरण मध्यमवर्गीय असतं.
शिरीष पाठारेंचं हे काम अव्याहतपणे सुरू राहणार. आणि त्यातच त्यांना समाधान मिळतं. अशी सुवर्णपदकं मिळवणं ही भारताची शानच आहे. आणि ती कायमच आहे, जोपर्यंत शिरीष पाठारेंसारखे गुरू आहेत, तोपर्यंत असे विद्यार्थी घडत राहणार.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours