नवी दिल्ली, २३ ऑगस्ट- मॅचफिक्सिंगमध्ये दरवर्षी एखादा खेळाडू तरी अडकत असतोच. मात्र आता मॅचफिक्सिंगचे वारे भारतीय संघावर वाहू लागले आहेत. २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील एक प्रसिद्ध खेळाडू बुकीच्या संपर्कात होता, असा गौप्यस्फोट माजी आयपीएस अधिकारी बी.बी. मिश्रा यांनी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, भारतीय संघातील त्या खेळाडूचे बुकीसोबतच्या संभाषणाची टेप मिश्रा यांना मिळणार होती. मात्र आयत्यावेळी बुकीने ती टेप देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांना आयपीएल फिक्सिंगबद्दल कसून चौकशी करण्याची जबाबदारी सोपवली होती.
न्यायालयात अहवाल सादर करण्यापूर्वी माझे बुकीसोबत बोलणं झालं होतं. मात्र, पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जाता आले नाही, असे मिश्रा यांनी सांगितले. ४ महिन्यांच्या काळात मिश्रांनी तब्बल १०० जणांची कसून चौकशी केली होती. यामध्ये काही खेळाडूंचाही समावेश होता. २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्या आलेल्या निवृत्त न्यायाधीश मुकुल मुद्गल यांच्या अहवालातही मिश्रा यांनी काही महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश केला होता.
मात्र या अहवालात फक्त अधिकाऱ्यांचेच तपशील समोर आणण्यात आले. खेळाडूंचा तपशील सादर करण्यात आला नाही. आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ९ क्रिकेटपटूंवर फिक्सिंगचा आरोप ठेवण्यात आला होता. त्या खेळाडूंनी असं का केलं हा आमच्या तपासाचा भाग नव्हता, तर या सर्व प्रकरणामागे कोण आहे हे शोधून काढायचे होते. मात्र ठोस पुराव्यांच्या अभावी खेळाडूवर आरोप करणं टाळल्याचं मिश्रा यांनी सांगितले.
२००८-०९ मध्ये एका आंतरराष्ट्रीय सामन्या दरम्यान, भारतीय संघातील तो खेळाडू सतत बुकीच्या संपर्कात होता. यावेळचं त्यांचं संभाषणही रेकॉर्ड करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याप्रकरणाची पुढे चौकशी करण्यासाठी  आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणं आवश्यक होतं. या सर्व कामासाठी मिश्रा यांना अतिरिक्त वेळ हवा होता. मात्र तो न मिळाल्यामुळेच या प्रकरणाचा छडा लागला नाही. मात्र आता हे प्रकरण पुढे कुठपर्यंत जातंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours