कल्याण, 26 ऑगस्ट : कल्याण मधील मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवाना राखी बांधून सामाजिक एकतेच दर्शन घडवलं आहे. कल्याण पासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवाना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. मलंगगडावर असलेला हिंदू व मुस्लिम धर्मातील तिढा न्यायालयात आहे. मात्र ते सर्व विसरून हिंदू-मुस्लिम भाविकांनी सामाजिक एकोपा जपला आहे.
एकीकडे दोन्ही धर्मीयांकडून एकतेच दर्शन घडवल्याने दोन्ही समाजामध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील भाविकांनी मध्यरात्री गडावर जाऊन नारळी भात आणि नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली. याच वेळी रक्षाबंधनसुद्धा साजरा करण्यात आला.
आज राखीपौर्णिमा आहे. बहीण-भावाच्या अतूट नात्याची साक्ष देणारा हा सण आणि याच दिवशी या हिंदू-मुस्लिम बांधवांनी एका नव्या नात्याची आठवण सगळ्यांना करून दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्यासोबत आहेत हे जाणवून देणारा हा दिवस.
आज बहीण भावाच्या हाताला राखी बांधते आणि भाऊ आयुष्यभर तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. एकमेकांवरचा विश्वास, प्रेम हे सगळं या राखीच्या धाग्यात गुंफलेलं असतं. तसंच नात हे प्रत्येकात हवं. आपल्या माणूसकीची जातीय वाटणी न करता ऐकोप्याने रहा सांगणारा हा सण ठरला आहे. म्हणून काळ कितीही बदलला तरी राखीपौर्णिमेचं महत्त्व काही कमी होत नाही. श्रावणातल्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो.
Post A Comment:
0 comments so far,add yours