मुंबई : मराठा तरुणावर हिंसाचाराचे गुन्हे दाखल केले जात आहे. गुन्हे मागे घेतले जातील असं सांगितलं होतं पण तसे आदेश कुठल्याही पोलीस स्टेशनला दिले नाही. मुख्यमंत्र्यांना हेच सांगतोय, तुम्ही दिलेला शब्द पाळा अशी आठवण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून दिली. तसंच मुख्यमंत्र्यांनी अनेक समाजांना न्याय देण्यासाठी दिलेला शब्द हा भूलथापा ठरू नये असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनात, अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची सध्या धरपकड सुरू आहे. त्यामुळे आज मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयक समितीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली. या बैठकीत कोपर्डी निर्भया प्रकरणातील कुटुंबीय ही उपस्थित होते. याच बैठकीत आंदोलनातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
माझ्यासोबत मराठा समाजाचे तरूण बसले आहेत. हा समाज रस्त्यावर उतरला आंदोलन शांततेत चाललं होतं पण कोणी लक्ष दिलं नाही त्यामुळे ठोक मोर्चा निघाले. महाराष्ट्र पेटवणारा कोणीही शिवरायांचा मावळा नाही. काही लोकांना त्रास दिला जातोय. गुन्हे दाखल केले जात आहे. पण गुन्हे मागे घेतले जातील असं सांगितलं होतं पण तसे आदेश कुठल्याही पोलीस स्टेशनला दिले नाहीत. मुख्यमंत्र्यांना हेच सांगतोय तुम्ही दिलेला शब्द पाळा असं आवाहन ठाकरे यांनी केलं.
पोलिसांकडे काही पुरावे असतील तर जरूर अटक करा, पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताबडतोब गुन्हे मागे घ्यावे, सणासुदीच्या काळात यांच्यावर कायद्याचे खोटं विघ्न आणत आहे ते दूर करा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.
अनेक समाज आहे त्यांच्या न्यायाबाबत विधानसभेचे अधिवेशन कधी भरावणार ?, लवकरच हे अधिवेशन भरवून त्यांचा प्रश्न सोडवावा, चालढकल करून या समाजाला फसवू नका. सरकारने दिलेली आश्वासन अजून पाळली नाहीत. कायद्याच्या चुकीचा वरवंटा त्यांच्या घरावर फिरतोय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द हा भूलथापा ठरू नये असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
कोपर्डी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आहे पण हे प्रकरण अडकलंय. उज्ज्वल निकम यांनी नेमणूक व्हावी आणि आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours