नागपूर : बहिणीला नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश देतो असे सांगून पन्नास हजारांनी फसविल्या गेलेल्या तरूणीच्या भावाने आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना नागपूरात घडलीय. तरुणाने आत्महत्या केल्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरवर जर आधीच गुन्हा दाखल झाला असता तर तरुणाचे प्राण वाचले असते अशी भावना आता व्यक्त केली जातेय.
बहिणीच्या शिक्षणासाठी भावाला आत्महत्या करावी लागली. हे ऐकून धक्का बसेल पण हे खरं आहे...अनंता प्रधान हा मोलमजुरी करणारा 21 वर्षांचा तरुण. पोटाला चिमटा देऊन त्याने बहिणीच्या शिक्षणासाठी एक एक पैसा जमा केला. पैसे जमा करून त्यानं आपल्या बहिणीला नर्सिंगसाठी अॅडमिशन मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नात त्याला 50 हजार रूपयांनी फसवलं गेलं. आपण फसवले गेलो हे लक्षात आल्यावर अनंताने पोलिसात तक्रार दिली. मात्र तिथेही त्याला कुणीच दाद दिली नाही. उलट त्याला पोलीस स्टेशन मधून हाकलून लावलं. त्यामुळं निराश झालेल्या अनंताने आत्महत्या केली.
बहिणीला नर्स बनवण्याचं त्याचं स्वप्न होतं. यासाठी त्याने सुधीर भोकरे या डॉक्टरची मदत घेतली. 50 हजार रूपये दिले तर अॅडमीशन मिळवून देतो असं आश्वासन डॉ. सुधीर याने दिले मात्र पैसे देवूनही त्याने अॅडमीशन काही दिली नाही असा आरोप अनंताची बहिण पिंकी प्रधान हिने केलाय.
अनंता आपल्या बहिणीसह नागपुरातील वाडी पोलिस ठाण्याच्या चकरा मारत राहिला पण पोलिसांनी त्याला दाद दिली नाही. शेवटी वाडी पोलिस पोलिसांनी त्याला हाकलून दिले. यातूनच खचून जात त्याने आत्महत्या केल्याचा आरोप अनंताचे मामा देवेंद्र कांबळे यांनी केलाय. अनंता गेल्यानंतर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल केला असल्याचही त्यांनी सांगितलं.
आता अनंताच्या आत्महत्येनतंर वाडी पोलिसांनी बोगस डाँक्टर सुधीर भोकरे याला अटक केली आहे. अनंताला आत्महत्येसाठी कुणी प्रवृत्त केलं याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नरेश पवार यांनी दिली. अशाच प्रकारे आणखी काही लोकांना फसवलं गेलंय का याचाही शोध पोलीस घेत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours