मुंबई, १३ सप्टेंबर- मुंबईतल्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस वर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांचे महागडे सामान चोरणाऱ्या चारजणांच्या टोळीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लॅपटॉप, मोबाइल असे एकूण दीड लाख रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. या टोळीला पकडल्यामुळे अजून काही गुन्ह्यांची उकल होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवारी रात्री एक प्रवासी शालिमार एक्स्प्रेसने शेगाव येथे जात असताना आरोपी आमिर रजा, खुश मोहम्मद रशीद शेख, प्रफुल्ल तिवारी आणि रसूल मुरतुझा शेख प्रवाशाजवळ रेल्वेच्या डब्यात आले.
त्या प्रवाशाशी जाणूनबूजून भांडण करून त्याच्याजवळचे ४० हजार रुपयांचे किमती सामान घेऊन पळू लागले. तेव्हा त्याने आरडाओरडा केला. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कर्तव्यावर तैनात असलेल्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून चौघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी लांब पल्ल्याच्या रेल्वेत चोरी करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्याकडून चोरीचे ४ लॅपटॉप, ४ किमती मोबाइल तसेच इतर सामान असा दीड लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. तसेच अजूही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी दिली.



Post A Comment:
0 comments so far,add yours