मुंबई: खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहित आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख माझ्यासारख्या देशातील साईभक्तांना झाले अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय.
चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सवयीप्रमाणे शिर्डीत येऊनही खोटे बोलले. युपीए सरकारने चार वर्षाच्या काळात 25 लाख घरे बांधली व तेवढ्याच कालावधीत एनडीए सरकारने 1 कोटी 25 लाख घरे बांधल्याचा खोटा दावा करून पंतप्रधानांनी देशातील जनतेची दिशाभूल केली आहे.
2004 ते 2013 या युपीए सरकारच्या कालावधीत इंदिरा आवास योजनेअंतर्गत 2 कोटी 24 लाख 37 हजार घरे बांधली. म्हणजेच युपीए सरकारच्या काळात प्रतिवर्ष 25 लाख घरे बांधून पूर्ण केली. मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेचे दिलेलं उद्दिष्ट्य अद्याप पूर्ण करता आले नाही. हे त्यांच्या सरकारने दिलेल्या आकडेवारीवरूनच सिध्द झालं आहे.
युपीए सरकारच्या काळात सन 2013 साली राजीव आवास योजना सुरू झाली. या योजने अंतर्गत एका वर्षात 1.17 लाख घरं बांधण्यात आली. मोदी सरकारने या योजनेचं नाव बदलून सरदार पटेल राष्ट्रीय शहरी गृहनिर्माण मिशन असं केलं व 2022 पर्यंत दोन कोटी घरे बांधण्याचे आश्वासन दिलं.
पण प्रत्यक्षात 10 जुलै 2017 पर्यंत फक्त 1.33 लाख घरं बांधली गेली. 2008 ते 2013 या काळात युपीए सरकारने 1 कोटी 28 लाख 92 हजार घरे बांधून पूर्ण केल्याचं 2014 च्या कॅगच्या अहवालात स्पष्ट झालंय. आता साईबाबांनीच पंतप्रधानांना खरे बोलण्याची सद् बुद्धी द्यावी अशी प्रार्थना आपण साईबाबांना करणार असल्याचा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours