मुंबई - शिकारीच्या शोधात मानवी वस्तीत २ कोल्हे आले आणि तेच भटक्या कुत्र्यांची शिकार बनलेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी अंधेरीतल्या लोखंडवाला भागातील कांदळवनात मध्य रात्रीच्या सुमारास घडली. परंतू स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळे जखमी झालेल्या दोन्ही कोल्यांचे प्राण वाचले.
मुंबईच्या अंधेरी लोखंडवाडवाला भागातील कांदळवनात २ दिवसांपूर्वी मध्य रात्रीच्या वेळेस अचानक १०-१२ कुत्र्यांनी दोन प्राण्यावर हल्ला केला. हे प्राणी होते दोन कोल्हे. जंगलात आढळणारे कोल्हे शिकारीच्या शोधात मानवी वस्तीत शिरले होते.
वास्तवीक पाहता कोल्हा एकटाच ३-४ कुत्र्यांचा फडशा पाडतो, पण जंगलात खाद्यच न उरल्याने आधीच अशक्त असलेले कोल्हे शिकारीच्या शोधात शहरी भागात आले आणि ते स्वत:च शिकार झाले. चांगली गोष्ट म्हणजे, दोन वन्यजीव प्राण्यांवर कुत्र्यांनी हल्ला केला हे पाहून स्थानिक नागरिकांनी त्या कोल्ह्यांची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली आणि ठाणे वनपरीक्षेत्र अधिकारी एस. एस. कंक यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी झालेल्या दोन्ही कोल्ह्यांना ताब्यात घेतलं. दोन्ही कोल्ह्यांवर उपचार करून त्यांना परत जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती ठाणे वनपरीक्षेत्र अधिकारी एस. एस. कंक यांनी न्यूज18 लोकमतला दिली.
यापूर्वी अशाचप्रकारे विक्रोळीतील गोदरेज परिसरात फिरणाऱ्या जखमी कोल्ह्याला ठाण्यातील 'रॉ' अर्थात 'रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' संस्थेनं पकडून त्याला जीवदान दिलं होतं. आणि ठाणे वनविभागाने त्याच्यावर उपचार करून त्याला परत जंगलात सोडलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours