रिपोर्टर सय्यद जाफरी
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) ग्रामपंचायतमध्ये भाजपचा अक्षरशः सुपडासाफ झाला. या गावातील निवडणुकीत सरपंच म्हणून कॉंग्रेसचे सुरेश डोंगरे निवडून आले असून 17 सदस्यांच्या या ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेसचे 16 सदस्य निवडून आले आहेत.आमदार सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना गावातच चीत केल्याचे बोलले जात आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्‍वर तालुक्‍यातील धापेवाडा तीर्थस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हे गाव गडकरी यांचे मूळ गाव असून या गावात अद्यापही गडकरींचा वाडा आहे. या गावातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल महत्त्वपूर्ण आहे.या गावातील निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजीव पोद्दार, गडकरींचे समर्थक रमेश मानकर यांच्यावर टाकली होती. मानकर व राजीव पोद्दार यांनी पूर्णवेळ दिल्यानंतरही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कॉंग्रेसकडून आमदार सुनील केदार व नागपूर जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते मनोहर कुंभारे यांनी ही बाजू पार पाडली. या विजयाबद्दल बोलताना केदार  म्हणाले,की नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खोट्या आश्‍वासनाचा परिणाम आहे.ग्रामीण भागातील लोकांना आता कर्जमाफी, शेतमालांना भाव न मिळाल्याने पसरलेला असंतोष या निवडणुकीत बाहेर आला आहे. कॉंग्रेसच्या सामान्य व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे आमदार केदार यांनी सांगितले. 


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours