10 आॅक्टोबर : अनेक जण म्हणाले उदयनराजे नको कुणीही चालेल, अगदी मला आडवं करायचं चाललंय. कोण कुणाला आडवं करतं बघू असं सांगत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहे. तसंच कुणाला वाटत असेल की मी उदयनराजेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येईन त्याने आकडे दाखवावे मी त्याच्या प्रचाराचे काम करेन असं जाहीर आवाहनच उदयनराजेंनी केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. राजे हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असून साताऱ्यात त्यांना पक्षातूनही विरोध होतोय. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जातेय.
उदयनराजेंनी या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिलंय. कामानिमित्त मी मंत्रालयात येत असतो. त्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याच्या भेटी घेत असतो. आज काही कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजनाबाबत चर्चा झाली, मतदारसंघातील कामाबाबत चर्चा झाली असं उदयनराजेंनी सांगितलं.
तसंच लोकशाहीत इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय पुढे जाता येत नाही, त्यामुळे अनेकांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते माझा त्याला विरोध नाही असंही उदयनराजे म्हणाले.
आजचे मंत्री आमदार नसल्यापासून माझे मित्र आहे. अनेक जण म्हणाले उदयनराजे नको कुणीही चालेल. अगदी मला आडवं करायचं चाललंय. कोण कुणाला आडवं करतं बघू असा इशाराच उदयनराजेंनी दिला.
राजे कुटुंबातील लोक जे लोकांबरोबर राहिले त्यांनाच लोकांनी स्वीकारले. मात्र राजे कुटुंबातील जे लोक लोकांमध्ये मिसळले नाहीत त्याच्याकडे लोकांनी पाठ फिरवली असं सांगत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंचं नाव न घेता टोला लगावला.
लोकांचा पाठिंबा याला मी खासदार पदापेक्षा जास्त महत्त्व देतो. कुणाला वाटत असेल की मी उदयनराजे पेक्षा जास्त मतांनी निवडून येईन त्याने आकडे दाखवावे मी त्याच्या प्रचाराचे काम करेन असंही उदयनराजेंनी जाहीरच केलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours