भिवंडी: आतापर्यंत खड्यांत पडून महाराष्ट्रभरात अनेकांनी आपले प्राण गमावले. आता याचाच कित्ता भिवंडी येथेही गिरवण्यात आला आहे. भिवंडी येथील वाडा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या खड्यांमुळे गणेश पाटील या युवकाला आपला जीव गमवावा लागला. दुचाकीवरुन घरी परतत असताना रस्त्यावरील खड्डयात पडून ३० वर्षीय गणेश जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने नजिकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गणेश २३ दिवसांपूर्वीच बाबा झाला होता. त्याला एक गोंडस मुलगी झाली होती. पण हा आनंद पाटील कुटुंबियांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही. गणेशच्या अकाली मृत्यूमुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
दरम्यान, वाडा-मनोर या रस्त्याची खड्ड्यांमुळे अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.  त्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणात अपघात होत आहेत. गणेशच्या मृत्यूची बातमी गावात पसरल्यानंतर गावातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी मृतदेह घेऊन  हा रस्ता बनवणाऱ्या सुप्रीमो  कंपनी तसंच शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. जोपर्यंत सुप्रीमो कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
नागरिकांच्या या भूमिकेनंतर गणेश पुरी पोलिसांनी मध्यस्थी करत लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर तब्बल दोन तासानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. तसंच सुप्रीमो कंपनी जोपर्यंत रस्ते दुरुस्त करत नाही तोपर्यंत टोल बंद ठेवावेत अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours