लखनऊ: काँग्रेसने कायम धोका दिला आहे, ते आघाडी करण्याबाबत गंभीर नाहीत असा आरोप करत बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेस सोबत आघाडी करणार नसल्याची घोषणा बुधवारी केली. सोनिया आणि राहुल गांधी यांना बसपासोबत जावं असं वाटतंय मात्र दिग्विजय सिंग यांच्यासारखे नेते त्यात आडकाठी आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मायावतींच्या या घोषणेमुळे सर्वात मोठा फायदा भाजपला होणार आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तरप्रदेशात भाजप विरूद्ध सर्व पक्ष एकत्र येतील ही शक्यता आता मावळल्यातच जमा आहे.
मायावती यांनी लखनऊत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सोबत जाणार नसल्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या बसपाने धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर काँग्रेसला नेहमीच मदत केलीय. पण प्रत्येक वेळी काँग्रेसने पाठित खंजीर खुपसला. आघाडी करण्याबाबत काँग्रेस मुळीच गंभीर नाही.
दिग्विजय सिंग हे संघाचे एजंट आहेत असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळेच बसपाने दक्षिणेत जनतादल धर्मनिरपेक्ष आणि हरियाणात इंडियन लोक दल आणि छत्तीसगढ मध्ये अजित जोगी यांच्या पक्षासोबत युती केली.
काँग्रेसपक्ष अहंकारी असून त्यांनी इतर पक्षांना कायम दुय्यम स्थान दिलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता काँग्रेसला धडा शिकवेल. बसपा हा कार्यकर्त्यांच्या घामातून तयार झालेला पक्ष आहे. हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाने चालणारा असल्याने बसपाचा वापर कुणीही करू शकणार नाही. काँग्रेस आज मुस्लिमांना तिकीट द्यायला घाबरते मात्र बसपा तसं कधीच करणार नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours