हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील चुंचा इथं लुडो गेमवर जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 28 हजार रूपये आणि सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. लुडो गेमवर जुगार खेळणाऱ्यांवर ही राज्यातील बहुतेक पहिलीच कारवाई असावी.

चुंचा येथे राष्ट्रीय महामार्गाच्‍या बाजूला एका लिंबाच्‍या झाडाखाली काहीजण मोबाईलवर पैसे लावून लुडो हा गेम  जुगार लावून खेळत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्‍या पथकाने बुधवारी दुपारी साध्या वेशात जावून छापा टाकला.

यामध्ये संजय परसराम मोहिते, सुनील दत्तराव कनके, गणपत सीताराम पवार, परसराम हरसिंग जाधव, पांडुरंग संभाजी चंद्रवंशी, सय्यद आरेफ, रामराव शेळके हे लुडो जुगार खेळत असल्‍याचे आढळून आले.

पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून २८ हजार रुपये आणि ३० हजार रुपयांचे सहा मोबाईल जप्‍त केले आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

दरम्‍यान, आखाडा बाळापूर परिसरात मागील काही दिवसात जुगारअडड्यावर छापे टाकले जात असताना डिजिटल जुगाराचा नवा फंडा सुरू झाला आहे. पोलिसांच्या पथकाने हा फंडाही उद्‍ध्‍वस्‍त केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours