मुंबई: मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग आला आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यावर उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. बुधवारी अधिवेशनाच्या आधी याबद्दल चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपसमितीचे नेते एकनाथ शिंदे यांनी न्यूज१८ लोकमतला दिली.

मराठा आरक्षण उपसमितीची आज संध्याकाळी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यावर एकमत झालं. उद्या विधीमंडळात मराठा आरक्षणावर एटीआर सादर करण्यात येणार आहे. तर 29 तारखेला विधेयक सादर केलं जाणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मागासवर्गाचा अहवाल सादर होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे.

उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा उपसमितीची बैठक होणार आहे. एटीआर बरोबर विधायक मांडायचं का यावर उद्या सकाळी चर्चा होणार आहे अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

त्याआधी संध्याकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास अर्धातास त्यांनी चर्चा केली.

यावेळी मराठा समाज बांधवांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, त्यांना तातडीने आरक्षण दिले पाहिजे. मराठा आरक्षण कोर्टात टिकणारं पक्क विधेयक बनवा अशी सुचना उद्धव ठाकरेंनी केली. तसंच इतर आरक्षण वर्गाला धक्का न लावता आरक्षण विधेयक आणावं आणि धनगर आणि इतर समाजाच्या न्याय मागण्यांसाठीही केंद्राकडे पाठपुरावा करून सकारात्मक प्रश्नं सोडवा अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

दरम्यान,मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. आम्ही स्वतंत्र आरक्षण देणार पण विरोधकांच्या मनात काळंबेरं आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. राज्य सरकार जी काही कारवाई करत आहे ती नियमाने करत आहे. कायद्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की, वार्षिक रिपोर्ट आणि अॅक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे. विधेयक मांडण्याआधी सभागृहात एटीआर मांडण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours