नागपूर: अस्मानी आणि सुलतानी संकटांनी सध्या शेतकरी अक्षरश: पिचून गेलाय. अपुरा पाऊस, सरकारची अनास्था, दुष्काळ आणि मालाला भाव नाही यामुळं त्याचं जगणच हालाखिचं बनलंय. त्यामुळं छोट्या-मोठ्या कर्जाची परतफेड करता येवू शकत नाही या वेदनेनं तो मृत्यूला कवटाळतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न आता सामाजिक संवेदनशीलतेलाच आव्हान बनलाय. यात सर्वाधिक फरफट होतं ती शेतकऱ्याच्या बायकोची
कर्ता नवरा गेल्यानं दु:खाचं कोसळलेलं आभाळ आणि घर चालवण्याची धडपड तिला करावी लागते. मुलांच्या भविष्यासाठी ती अश्रू पुसून पुन्हा उभी राहते आणि आपलं विश्व तयार करते. शेतकरी कुटूंबातल्या बाईची ही धडपड, दु:ख, वेदना आता रंगमंचावर आलीय. हे दु:ख भोगत असलेल्या महिलांनीच आपली ही वेदना समाजापुढं मांडली ती 'तेरवं...' या नाटकाच्या रूपानं.
संवेदनशील आणि सामाजिक भान असलेले लेखक श्याम पेठकर यांनी हे नाटक लिहिलं असून हरीश इथापे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. विदर्भातल्या अध्ययन भारती परिवार आणि अॅग्रो थिएटर या संस्थांच्या मदतीनं हे नाटकं रंगमंचावर आलं आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours