जिल्हा संपादक शमीम अकबानी
संविधान दिन साजरा
भंडारा, दि. 26 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्माचा, सर्व व्यक्तींचा तसेच सर्वांच्या हिताचा सविस्तर विचार करुन संविधान लिहिले असून संविधानाच्या मुल्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. संविधानाच्या मुल्यानुसारच आचरण केल्यास तोच खरा संविधानाचा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाळे यांनी केले.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या सभागृहात आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, ज्येष्ठ पत्रकार हिवराज उके, मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या गृहपाल रजनी वैद्य, मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे व बार्टीचे गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन संविधान सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले.
देशातील प्रत्येक नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यकती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य आणि दर्जाची व संधीची समानता संविधानाने प्रधान केली आहे. जगातील सर्वोत्तम संविधान म्हणून भारतीय संविधानाचा लौकिक असून या संविधानाचा सन्मान करणे भारतीयांचे प्रथम कर्तव्य असल्याचे कल्पना भंगाळे यांनी सांगितले.
सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ही आपल्या संविधानाची वैशिष्टय आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता, एकात्मता, बंधुता व विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाचा आत्मा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसमावेशक व सर्वहितकारक असे संविधान आपणास दिले. या संविधानाच्या मुल्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे हाच संविधानाचा सन्मान आहे, असे हिवराज उके यांनी सांगितले. बाबासाहेबाच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी संविधानाच्या मुल्यानुसार कार्य करणे आवश्यक आहे.
आज संविधानाच्या निमित्ताने आपले अधिकार व कर्तव्ये याबाबत प्रत्येक नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे संविधानाचे पावित्र्य टिकविण्यासाठी कटिबध्द होणे गरजेचे आहे. संविधान हे प्रत्येक घरात असायला हवे असे सांगून उके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी व युवक-युवतींनी संविधानाचा अभ्यास करुन आपल्या जीवनात अंमल करावा. असे केल्यास हाच खरा संविधानाप्रती सन्मान असेल.
या कार्यक्रमात सविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. आज पासून सुरु झालेला संविधान सप्ताह 2 डिसेंबर पर्यंत चालणार असून या सप्ताहादरम्यान संविधानावर आधारित विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात चित्रकला स्पर्धा , संविधान गौरव रॅली स्पर्धा, पथनाटय स्पर्धा, संविधानावर आधारित मुशायरा, वकृत्व स्पर्धा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. हे सर्व कार्यक्रम नागपूर येथे होणार आहेत.
यावेळी सिमा कांबळे या विद्यार्थींनीने संविधानावर आधारित उत्कृष्ट भाषण केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, तरुण-तरुणी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन गोडबोले यांनी केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours