मुंबई, 25 नोव्हेंबर : राम मंदिराच्या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषदेनं अयोध्या, नागपूर आणि बंगळुरूमध्ये हुकार सभेचं आयोजन केलं आहे. तिन्ही ठिकाणी लाखो कार्यकर्ते या हुंकार सभेत सहभागी होण्याचा दावा करण्यात आला आहे.

नागपूरमधली हुंकार सभा संघ मुख्यालयापासून २ किलोमीटरवर असलेल्या क्रीडा चौक, हनुमान नगर इथं होणार आहे. त्यासाठी कालपासून जय्यत तयारी सुरू आहे. या सभेसाठी ६० बाय ८०चं भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे.

साध्वी ऋतंभरांसह अनेक धार्मिक गुरू या सभेत सहभागी होणार आहेत. कोणतंही प्रक्षोभक विधान करता कामा नये, या अटीवरच पोलिसांनी सभेला परवानगी दिली असल्याची माहिती आहे. 

संसदेत कायदा करून सोमनाथ मंदिर बांधण्यात आलं, त्याचप्रमाणे कायदा करून वा अध्यादेश काढून अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावं, अशी मागणी विहिंपतर्फे करण्यात आली आहे.

दरम्यान, या सभेच्या वातावरणनिर्मितीसाठी संपूर्ण विदर्भात सुमारे शंभर ते दीडशे बैठका घेण्यात आल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नागपूरात बाईक रॅली आणि महाआरतीही आयोजित करण्यात आली. या हुंकार सभेला संपूर्ण विदर्भातून एक लाख कार्यकर्ते येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours