नाशिक: अवनी, अर्थात टी-1 वाघिणीला ठार मारल्यामुळे वन खात्यावर चौफेर टीका होत आहे. अवनी वाघिणीच्या शिकारीवरुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडायला सुरूवात झाली आहे. आज सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघिणीला नाईलाजाने ठार मारावे लागले असं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच सोशल मीडियातून टी 1 वाघिणीबद्दल हीन दर्जाची टीका केली जात आहे त्यामुळे वन विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे असंही मुनगंटीवार म्हणाले.
१३ जणांना ठार मारण्याच्या आरोपावरून अवनी या टी-१ वाघिणीला शुक्रवारी रात्री ठार मारण्यात आलं. अवनीला ठार मारल्यानंतर वन्यप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तसंच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीही राज्य सरकारवर अवनीच्या हत्येचा आरोप केला. त्यामुळे आज नाशिकमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघिणीला ठार मारण्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय.
सुप्रीम कोर्टाने अवनी वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वनविभागाने कारवाई सुरू केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अवनी वाघिणीचा शोध घेतला जात होता. परवा एका गावकऱ्याने टी-१ वाघीण दिसल्याची माहिती दिली आणि शोध मोहीम सुरू झाली. ट्रॅक्युलाझ केल्यानंतर वाघीण लगेच गुंगीत जात नाही कारण डोस कमी द्यावा लागतो. अशात वाघिणीने जिप्सीवर हल्ला केला आणि नाईलाजाने तिला ठार करावं लागलं असं मुनगंटीवार म्हणाले
Post A Comment:
0 comments so far,add yours