मुंबईतल्या ३0२६ इमारतींना अग्निशमन दलाची नोटीस, ३६ सोसायट्यांविरोधात खटला
मुंबई, 04 डिसेंबर : अग्निप्रतिबंध उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुंबईमधील  ३ हजार  २६ इमारतींच्या पदाधिकाऱ्यांवर अग्निशमन दलाने नोटीस बजावली आहे. नोटीस बजावल्यानंतरही अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३६ सोसायटय़ांविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे.

तरीही दर सहा महिन्यांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. ताडदेव परिसरातील 'ए-१ सम्राट अशोक' इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रविवारी पहाटे लागलेल्या आगीनंतर पुन्हा एकदा मुंबईतील टोलेजंग इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

'ए-१ सम्राट अशोक' या इमारतीमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये पाहणी केली होती. पाहणीदरम्यान इमारतीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी आढळूल्या होत्या. त्यामुळे अग्निशमन दलाने या २२ ऑक्टोबर २०१८ रोजी नोटीस बजावली होती.

मात्र तरीही सोसायटीने अग्निप्रतिबंधक यंत्रणेतील त्रुटी दूर केल्या नसल्याचे रविवारी तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले होते. या घटनेनंतर मुंबईतील इमारतींमधील एकूणच अग्निप्रतिबंधक उपाययोजनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तर मुंबईतल्या गोरेगाव इथल्या आरे कॉलनीत लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. पण ही आग जाणूनबुजून लावण्यात आली असा आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे आता या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी तब्बल चार तासानंतर  आग आटोक्यात आली.  त्यासाठी 100 स्वयंसेवक , पाच फायर ऑफिसर , 10 फायर इंजिन , सात जंबो टॅंक आणि इतर दलांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

आरे जंगलाला लागलेली आग जवळपास चार किलोमीटरपर्यंत पसरली होती. या आगीमुळं अनेक झाडं आणि वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

आरे कॉलनीतली आग है नैसर्गिकरित्या लागली नसून ती लावण्यात आल्याचा आरोप पर्यावणप्रेमींनी केलाय. त्यामुळं आग विझवण्याबरोबरच आगीचं कारण शोधण्याचं आव्हानही सरकारी यंत्रणासमोर असणार आहे.

आरे कॉलनीत अनेक आदिवासी पाडे आहेत.. आगीमुळं निर्माण झालेल्या धुरामुळं परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास झाला होता.

आग लावण्यात आल्याच्या आरोपात तथ्य असेल तर दोषींविरोधात कारवाई केली जाईल असं  केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय. तर मुंबईचे सहाय्यक मनपा आयुक्त संजोग कबरे यांनी आगीची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours