ठाणे, 25 डिसेंबर : ठाणे शहरात दुचाकी जाळण्याचं सत्र अजूनही सुरुच आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास पाचपाखाडी भागातील हनुमान सोसायटी परिसरात 18 दुचाकी अज्ञातांनी जाळल्याचा धक्कादायाक प्रकार घडला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे ठाण्यात सध्या स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.
रात्री अडीच वाजता ही घटना घडली आहे. गाड्यांनी पेट घेताच स्थानिक सावध झाले आणि आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात यश आलं. यात मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर संतप्त नागरिकांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याआधीही गाड्या पेटवून देण्याच्या अशा घटना घडल्या आहेत. 6 डिसेंबरला पाचपाखाडी भागातच पहाटेच्या सुमारास ९ दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. गाढ झोपेत असलेल्यांच्या घराबाहेर त्यांच्या गाड्या धगधगत होत्या.
तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला गाड्या जळताना दिसल्या आणि त्यानंतर त्याने तातडीनं अग्निशमन दलाला याची माहिती दिली. मात्र तोवर 9 गाड्या आगीच्या विळख्यात जळून खाक झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत जळणाऱ्या गाड्यांशेजारच्या गाड्या वेळेत बाजूला हटवल्या. याप्रकरणी अज्ञातांविरोधात नौपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
आताही तसाच प्रकार घडला आहे. त्यामुळे एकाच परिसरात वारंवार गाड्या जाळण्याच्या प्रकारामुळे एखादी टोळी हे सगळं करत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अज्ञांताचा कसून तपास करण्यास सुरुवात केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours