पुणे: राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हे ढग जमा झाले असून, येत्या 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामान असून, गारठाही कायम आहे. मंगळवारी सर्वात कमी 12.9 अंश तापमानाची नोंद नागपूर येथे झाली. औरंगाबाद येथे 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात देखील 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून, थंडीचा जोर कायम आहे.
दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात हलके ढग स्थिरावले आहेत. यामुळे राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी तापमान सरासरीच्या जळपास असल्याने थंडी कायम असल्याचं वेधशाळेनं म्हटलंय. विषुववृत्ताजवळील हिंदी महासागर आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाहदेखील सक्रिय असल्याने दक्षिण भारतात पाऊसाची शक्यता निर्माण झाली आहे. ही शक्यता कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा निर्माण झाली असून, येत्या 24 तासात या भागांत तुरळस सरी पडू शकतात असं वेधशाळेनं म्हटलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours