मुंबई, 15 डिसेंबर : 'सरकारला सत्य सांगणारे लोक नकोत व होयबा हवेत. शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक त्याच हेतूने झाली असेल तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे,' असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. 

'दास हे अर्थशास्त्राचे अभ्यासक नाहीत. ते आय.ए.एस. म्हणजे नागरी सेवेत होते व मोदी यांच्या सर्वच बऱ्यावाईट आर्थिक धोरणांचे टाळय़ा वाजवून समर्थन करणारे म्हणून ते ओळखले जातात. दास हे इतिहासाचे अभ्यासक आणि पदवीधर आहेत. रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी अर्थतज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अनेक मान्यवर संस्थांतून काम केले व त्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रतिष्ठा मिळाली. शक्तिकांत दास यांच्या बाबतीत तसे खात्रीने सांगता येणार नाही,' असं म्हणत सामनातून दास यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. 

'देशात सध्या आर्थिक आराजक'

'रघुराम राजन यांनी नोटाबंदीसारख्या थिल्लर प्रकारांना विरोध केला. उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता टिकावी म्हणून पदत्याग केला. आर.बी.आय.ची प्रतिष्ठा आणि स्वायत्तता पणास लागलेली असताना मोदी सरकारने दास यांना नेमले आहे. दास यांच्यापुढील मुख्य आव्हान हे आहे की रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता सुरक्षित आहे हे जगातील गुंतवणूकदारांना दाखवून द्यावे लागेल. उर्जित पटेल यांनी मोदी सरकारला बँकेच्या रिझर्व्ह फंडावर डल्ला मारण्यापासून रोखले. देशात सध्या जे आर्थिक अराजक माजले ते चुकीच्या धोरणांमुळे,' अशा शब्दांत सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours