मुंबई : अचानक सुटलेला सोसाट्याचा वारा आणि पाठोपाठ जोरदार पावसानं शुक्रवारी तळकोकणाला झोडपलं आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. महाराष्ट्रात पुढचे 2 दिवस पावसाचे असणार आहेत. कोकणासह विदर्भात ढगाळ वातावरण आणि वादळी पाऊस होऊ शकतो. राज्याच्या इतर भागातही धुकं, ढग असं वातावरण राहणार आहे. कणकवली, कसाल, वैभववाडी परिसरात संध्याकाळी अचानक ढग भरून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पुढचे काही दिवस अशाच प्रकारे पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नुकतीच कुठे कोकण परिसरात थंडीला सुरुवात झाली होती. आता ढगाळ हवामानामुळे तापमानात वाढ झाली आहे. कोकणातच नाही, तर विदर्भातही 16 आणि 17 डिसेंबर हे दोन दिवस ढगाळ हवामान असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी नोंदवला आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्व-यवतमाळ जिल्ह्यांतल्या काही भागात या दरम्यान वादळी पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा परिणाम
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी नोंदवला आहे. पूर्व-अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळचा परिणाम होऊ शकतो. या हवामानाच्या स्थितीमुळे पूर्व-विदर्भात धुकं राहील आणि कमाल तापमानातही घट होईल.
राज्यातील इतर भागात 15 ते 17 डिसेंम्बर दरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. पूर्व-विदर्भातील शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours