मुंबई : बेस्ट पाठोपाठ आता ओला-उबर संपावर जाण्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसांत ओला-उबर या दोन्ही कंपन्यांनी मिळून सुमारे 5000 चालकांवर बेशिस्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे, ओला-उबरचे वाहनचालक संपाचे हत्यार उपसणार आहे. याबद्दल सोमवारी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. 

मागील वर्षी ऑक्टोबर 2018 मध्ये ओला-उबरच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. वाहनचालकांनी संप पुकारल्यामुळे आता दोन्ही कंपनीकडून बेशिस्तीचा ठपका ठेऊन कारवाई सुरू, असल्याच्या आरोप वाहनचालक संघटनेनं केला आहे. कंपनीकडून जाणीवपूर्वक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात दिलेले आश्वासन सरकार किंवा कंपनीनं अद्याप पाळलेलं नाही. या उलट, वाहनचालकांवर कोणतेही कारणं न देता कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे, असं या वाहनचालकांचं म्हणणं आहे.

म्हणूनच संघटनेनं या कारवाईविरोधात संपाचा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. सोमवारी संपाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे. 

सोमवारपर्यंत बेस्ट कर्मचारी संपावर ठाम

दरम्यान, गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्रिसदस्यीय समितीबरोबर शनिवारी दुपारी बैठक झाली. या समितीने कृती समितीच्या मागण्या तसंच बेस्ट प्रशासन आणि पालिकेची नेमकी भूमिका काय?, हे लिखित स्वरूपात मागवून घेतले आहे. त्यानंतर याबद्दलची भूमिका ही सोमवारी समिती उच्च न्यायालयापुढे मांडणार आहे.

आज संपावर तोडगा निघाला नसल्यामुळे शनिवार आणि उद्या रविवार असल्याने संप दोन दिवस चालूच राहील असं दिसतं आहे. सोमवारीच संप संपवण्याबाबतची कृती समिती भूमिका घेऊ शकते. तर या बैठकीतही बजेट विलीनीकरणाला आयुक्तांचा विरोध असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours