गडचिरोली: माओवाद्याच्या हल्ल्यात जखमी जवानासाठी जीव धोक्यात घालून उपचारासाठी धावणाऱ्या डॉ. चरणजीत सलुजासह महाराष्ट्रातील पाच जणांना राष्ट्रपतींचे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील 48 व्यक्तींना आज राष्ट्रपतींचे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यात गडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्लयात जखमी जवानांच्या मदतीला धावून जाऊन जीवदान देणाऱ्या डॉ. चरणजीत सलुजा यांच्यासह महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे.
गडचिरोलीत माओवादाविरोधी हल्ल्यादरम्यान चकमकीत जखमी झालेल्या जवानांच्या उपचारासाठी आलापल्ली येथील डॉ. चरणजीत सलुजा राञी बेराञी धावून गेले होते. कोरेपल्लीची चकमक आणि बेजुरपल्लीतल्या भुसुरुंगस्फोटासह मिरकल येथील माओवाद्यांचा जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या दरम्यान, स्वतः धोका पत्कारून डॉ. चरणजीत सलुजा गेले होते. जवानांना वेळीच उपचार करुन डाॅ. चरणजीत सलुजा यांनी आपले कर्तृव्य बजावले होते. त्याच्यासह अमोल लोहार यांनाही उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे.
तर राज्यातील कौस्तुभ तारमाळे आणि प्रथमेश वाडकर यांना मरणोत्तर 'सर्वोत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाले आहे. तसंच ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार धैर्यशिल आडके यांनाही जाहीर झाला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours