मुंबई, 26 जानेवारी : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंधेला केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली. पण या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव नसल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
'भारतरत्न नक्की कुणाला? आज नानाजी देशमुख, भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी. शेम शेम,' असं ट्वीट करत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. त्याचबरोबर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगितकार भुपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
भारतरत्न आणि राजकारण
2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतरत्न पुरस्कारासाठी या तीन मोठ्या नेत्यांची निवड केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
2014 मध्ये जी लाट होती ती लाट यावेळी नाही याची जाणीव आता भाजपलाही झाली आहे. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला 2014 मध्ये 70 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. तेवढ्या जागा मिळण्याची यावेळी शक्यता नाही त्यामुळे नुकसान होणाऱ्या जागांची बेगमी इतर ठिकाणांवरून करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
त्यात पश्चिम बंगाल आणि आसाम ही राज्य महत्त्वाची आहेत. प्रणव मुखर्जी आणि भुपेन हजारीका यांच्या निवडीकडे त्या दृष्टीकोणातूनही पाहिले जाते. तर नानाजी देशमुख यांच्या निवडीमुळे नाराज असलेल्या संघ परिवारातल्या धुरीणांना दिलासा मिळू शकतो.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours