औरंगाबाद, 26 जानेवारी : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार की नाही, याबाबत अजुनही संभ्रम आहे. अशातच आता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी भाजवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
'युतीचा कुठं काय? आम्हाला वरून आदेश आला ठोका म्हणून तर आम्ही ठोकणार, झोडा असा आदेश आला तर आम्ही झोडायला सुरुवात करणार,' असं म्हणत दिवाकर रावते यांनी शिवसेना आगामी काळात भाजपविरोधात आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
युतीबाबत काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?
राज्यात युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक दावा केलाय. राज्यात शिवसेनेसोबत युती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र युती झाली नाही तर आता लोकसभेत भाजपकडे जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा एक जागा भाजप जास्त जिंकेल असा दावा दानवेंनी केलाय. दानवेंचा हा दावा म्हणजे शिवसेनेला टोला समजला जातोय.
येत्या 28 तारखेला जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. दानवे म्हणाले, "भाजपने 2014मध्ये जिंकलेल्या जागांपेक्षा एक जागा जास्तच जिंकू पण कमी नाही, राज्यात समविचारी पक्षांची युती झाली पाहिजे. मतविभाजन होऊन त्याचा फायदा कांग्रेस राष्ट्रवादीला होऊ नये, अशी आमची भूमिका आहे."
दरम्यान, याचवेळी सेनेकडून अर्ध्या जागा मागण्यात आल्याच्या प्रश्नावर, तसा कुठलाच प्रस्ताव सेनेकडून आला नाही आणि त्यासंदर्भात एकही बैठक झाली नसल्याचा दावा ही दानवे यांनी केला.
Post A Comment:
0 comments so far,add yours