मुंबई, 26 फेब्रुवारी : 'निवडणुकांची चाहूल लागली आहे. असेही म्हणता येईल की, दरवाजावर टकटक करून निवडणुकांचे वारे आत घुसले आहेत. एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा झाले हे चांगले झाले. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाखांपैकी किमान दोन लाखांचा पहिला हप्ता जमा होईल अशी आशा पुन्हा जिवंत झाली आहे,' असं म्हणत आता शेतकऱ्यांना केली जाणारी मदत ही राजकीय फायद्यासाठी असल्याचं सांगत शिवसेनेनं भाजपला टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतल्यानंतर शिवसेनेनं त्यांच्यावर टीका केली आहे. 'डिजिटल इंडियात ही पायधुणी आली कोठून? पंतप्रधानांनी गंगाकिनारी सफाई कामगारांचे पाय धुतले. याबद्दल अभिनंदन, पण सफाई कामगारांचे प्रश्न ‘पाया’चे नसून ‘पोटा’चे आहेत,' असा हल्लाबोल शिवसेनेनं आपलं मुखपत्र 'सामना'तून केला आहे.
काय आहे 'सामना'चा अग्रलेख?
हे सर्व आधी करता आले असते, पण तेव्हा करून फायदा नव्हता. ‘जीएसटी’ वगैरे माध्यमांतून दोनेक वर्षे जमा केले व आता वाटप सुरू केले असेच फार तर म्हणावे लागेल. जनतेचा पैसा जनतेच्याच खिशात जात आहे. हे सर्व निवडणुकीवर डोळा ठेवून चालले असल्याचा आरोप झाला आहे. आरोपांचे काय घेऊन बसलात? काही केले नाही तरी आरोप तर होतच असतात. निवडणूकपूर्व अर्थसंकल्प व घोषणा या राजकीय फायद्याचा विचार करूनच केल्या जातात व सत्तेवर असलेला प्रत्येक राजकीय पक्ष तेच करीत असतो. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जाऊन गंगास्नान केले, म्हणजे ‘डुबकी’ मारली. पंतप्रधानांनी गंगेत डुबकी मारली व नंतर सफाई कामगारांचे पाय धुऊन ‘करसेवा’ केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. पंतप्रधान सफाई कामगारांचे पाय धूत आहेत, पंतप्रधानांनी भगवी वस्त्रे परिधान करून कपाळावर चंदन, भस्म वगैरे लावल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. हे सर्व नेहमीच ठरवून केले जाते व त्याचे राजकीय रंग-तरंग उमटत असतात. 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधानांनी केसरी पगडी परिधान करून हिंदुत्ववादी मतदारांना संदेश देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तीन राज्यांत भाजपचा पराभव झाला व ही सर्व राज्ये परंपरेने हिंदुत्ववादी होती.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours