मुंबई, 30 जुलै : राज्यभरात सुरू असलेली काँग्रेस-राष्ट्रवादीची गळती थांबताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे तीन तर काँग्रेसचा एक आमदार उद्या 31 जुलै (बुधवार)भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संदीप नाईक, आमदार वैभव पिचड आणि काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांची पुण्यातील निवास्थानी भेटही घेतली होती. पण त्यानंतर शिवेंद्रराजेंचा भाजपप्रवेश रोखण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्याचं दिसत आहे. कारण बुधवारी शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
भाजप प्रवेशावर काय म्हणाले शिवेंद्रराजे?
कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या हिताचा योग्य तो निर्णय घेणार आहे, असं म्हणत काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर शिवेंद्रराजे यांच्या अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांनी एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीनंतर शिवेंद्रराजे यांनी भाजप प्रवेश करावा, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
शिवेंद्रराजेंबद्दल अजित पवार काय म्हणाले?
विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी आमदार शिवेंद्रराजे अनुपस्थित होते. 'लोकसभेला साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी कोणतीही मुलाखत न देता पक्षाने त्यांना तिकीट दिले होते. त्यामुळे चर्चा करून नंतर शिवेंद्रराजेंनाही तिकीट देता येऊ शकते. काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रसिंहराजे आणि इतर आमदारांची पवार साहेबांबरोबर मीटिंग झाली आहे,' असं म्हणत अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या अनुपस्थिती बाबत भाष्य केलं होतं.
Post A Comment:
0 comments so far,add yours