पुणे, 26 फेब्रुवारी : मूकबधीर आंदोलकांवर परवानगी न घेता मोर्चा काढल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर झालेल्या मोठ्या टीकेनंतर आता पोलीस आणि सरकार बॅकफूटवर गेलं आहे. आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नयेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 
आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मूकबधीर आंदोलकांवर पुणे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आणि त्यानंतर आंदोलकांवरच गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या. दंगल माजवणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरूही झाली होती. आंदोलकांचे नेते प्रदीप मोरे आणि पटवारी यांच्यासह दोन ते अडीच हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार होता.
या संतापजनक प्रकारानंतर पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठली. त्यामुळे अखेर रात्री उशिरा आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नयेत, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ससामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांशी चर्चा करुन मार्ग काढावा, अशाही सूचना मुख्यमंत्री फडणवीसांकडून देण्यात आल्या आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours