मुंबई, 26 फेब्रुवारी : पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. 12 लढाऊ विमानांनी ही कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेनं केलेल्या या कामगिरीबाबत राज्याच्या विधीमंडळात अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावा विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पाठिंबा दिला आहे.
'अशा कारवाया आपल्यावर केल्या तर भारत कसं सडेतोड उत्तर देऊ शकतो हे सगळ्या जगाने आज पाहिलं,' असं म्हणत अजित पवारांनी अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा दिला.
काय म्हणाले अजित पवार?
- पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांच्या सहनशीलतेचा अंत झाला होता
- देशाचा प्रश्न आल्यावर आपण सर्वजण एक असतो हे आपण दाखवून दिलं
- ज्यावेळेस अशी परिस्थिती येईल त्यावेळेस सव्वाशे कोटी भारतीय एक आहोत हे दाखवून देऊ
- जेणेकरून कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत करणार नाहीत
कसा केला भारतीय वायूसेनेनं दहशतवाद्यांवर हल्ला
पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. एएनआयनं याबद्दलची माहिती दिली आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.
भारतीय लढाऊ विमानांनी LoC पार करून पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश केला. भारताकडून 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत अद्याप भारतीय वायूसेनेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच वायूसेनेकडून याबाबत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.
सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा विचार सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर 14 फेब्रुवारीला हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केलेल्या या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours