मुंबई, 24 फेब्रुवारी : मुंबईसह राज्यातील शहरांच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. शनिवारी मुंबईचं किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथे १५.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे, थंडी कमी झाली असून, तापमानाचा पारा चढल्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान थेट ३८ अंशावर आलं आहे.
कमाल तापमानाने घेतलेल्या उसळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र तापला आहे. मुंबईचे कमाल तापमानही ३६ अंश नोंदविण्यात येत असल्याने उन्हाच्या झळा वाढत आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाडा, तसेच विदर्भाच्या काही भागांत तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वढ झाली आहे.
विदर्भाला पावसाची शक्यता
विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. २६ ते २७ फेब्रुवारीदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.
रविवारसह सोमवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, १९ अंशाच्या आसपास राहील. असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours