सांगली, 15 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लात 44 जवान शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातीलही दोन जवानांचा समावेश आहे. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सरकारच्या वतीने 50 लाख रुपयांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शहिदाच्या कुटुंबीयाला 1 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
'पाकिस्तान हा देश भिकारी झाला आहे. त्याची जागा आम्ही दाखवून देणार. हा जुना भारत नाही. हा नवीन भारत आहे. त्यामुळे पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले जाणार,' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुलवामा इथल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ शिल्प व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती शिल्प यांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे.
'आम्ही पेटलेले आहोत. सर्वांच्या मनात आता राग आहे. जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. त्याचा निषेध व्यक्त करतो. जवानांच्या कुटुंबानो काळजी करू नका. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार आहोत,' असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पाकवर टीकास्त्र सोडलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours