अहमदनगर, 28 मार्च: काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. ही भेट कशासाठी आणि दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मिळाला नाही. मात्र नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे, भाजपचे नगरचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्य दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
खासदार दिलीप गांधींशी आपण चर्चा केली असून त्यांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचे सुजय विखेंनी नुकतेच म्हटले होते. त्यामुळे राधाकृष्ण विखेंची ही भेटही नाराजी दूर करण्यासाठीच तर नव्हती ना, असाही प्रश्न उपस्थित होतो. राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या काँग्रेसमध्येच असले तरी आपण आघाडीच्या उमेदवाराचा नगरमध्ये प्रचार करणार नाही, असे त्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला नगरची जागा न सोडल्याने सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला होता.
Post A Comment:
0 comments so far,add yours