मुंबई, 16 मार्च : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीएसएमटी पूल दुर्घटनेचं खापर विविध प्रशासन यंत्रणावर फोडले आहे. 'ऑडिट आणि दुरुस्तीच्या कामात निदान आता तरी विविध प्रशासन यंत्रणांचे ‘पायात पाय’ येऊ नयेत आणि मुंबईतील पादचारी पूल हे ‘मृत्यूचे पूल’ राहू नयेत. तरच मुंबईकरांच्या मागे लागलेले पूल दुर्घटनांचे शुक्लकाष्ठ थांबू शकेल', असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून म्हटलं आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?
- मुंबई अलीकडील काही वर्षांत ‘मृत्यूची मुंबई’ ठरत आहे. कोणी लोकलमधील रेटारेटीचा बळी ठरतो तर कोणी रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीचा. नैसर्गिक आपत्ती, अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजले आहेत. त्यात सध्या आग आणि पूल दुर्घटना या नव्या जीवघेण्या संकटांची टांगती तलवार मुंबईकरांच्या डोक्यावर आली आहे. ती कधी कोसळेल आणि किती जीव घेईल याचा नेम राहिलेला नाही. गुरुवारी अशाच एका पूल दुर्घटनेत सहाजणांचा जीव गेला.
- मुंबईचा अनियंत्रित विस्तार, प्रचंड लोकसंख्येचा येथील नागरी आणि इतर सुविधांवर पडणारा ताण, त्यामुळे बिघडलेले शहर नियोजन अशा अनेक कारणांमुळेच मुंबईची अवस्था सध्या बिकट झाली आहे. पुन्हा या नागरी सेवासुविधा, इतर व्यवस्था, त्यांची दुरुस्ती-देखभाल आणि जबाबदारी हेदेखील एक त्रांगडेच झाले आहे. मुंबई महापालिका, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, नॅशनल हायवे ऍथॉरिटी वगैरे अनेक प्रशासन यंत्रणांची कामे एकाच वेळी या महानगरीत सुरू असतात. मात्र ‘अनेक पायांची शर्यत’ झाल्याने ती रखडतात. त्यातून मग एखादी दुर्घटना घडते आणि जबाबदारी आणि दोषारोपांचे बोट एकमेकांकडे दाखवले जाते. त्याचाही परिणाम कामांच्या वेगवान पूर्ततेवर आणि गुणवत्तेवर होतोच.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours