मुंबई,27 मार्च : गेल्या दोन वर्षात अनेकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. परीक्षेचे निकालातील त्रुटी आणि त्यानंतर कुलगुरुंच्या राजीनाम्यापर्यंत विद्यापीठ चर्चेत राहिले आहे. आताही शासकीय विधी महाविद्यालयाच्या पदवी परीक्षेत विचारलेल्या धक्कादायक अशा प्रश्नाने पुन्हा विद्यापीठावर टीकेची झोड उठली आहे.
मुबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयाची 16 मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली. यात विचारण्यात आलेल्या प्रश्नांने विद्यार्थ्यांसह वकीलसुद्धा आश्चर्यचकीत झाले आहेत. कायदा गाढव, वकील फसवणूक करणारे, लबाड तर न्यायाधीश यावर औषध आहे का? असा प्रश्न परीक्षेत विचारला गेला. जर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले तर कायद्याकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन कसा असेल? त्याकडे व्यवसायाचा चांगला पर्याय म्हणून कसे पाहतील असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून विचारला जात आहे.
फक्त एकाच प्रश्नावर नाही तर इतरही काही प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. यात वकिली व्यवसायात येणाऱ्या मुलांचे शोषण केले जाते याची कल्पना असतानाही ते या व्यवसायात का येतात? असाही प्रश्न विचारला होता. तसेच धार्मिक विश्वास आणि पद्धतीने तुम्ही नरकात जाता याचेही कारणांसह उत्तर द्या असे म्हटले होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours