कोल्हापूर: अख्ख्या महाराष्ट्रात पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापुरची ओळख आहे, पण याच जिल्ह्यातल्या 60 गावांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. सिंचन प्रकल्प रखडल्याने गावकऱ्यांना इतका टोकाचा निर्णय लागला.
कोल्हापुरातल्या गगनबावडा, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर सध्या बहिष्काराचे फ्लेक्स झळकत आहेत. कारण या 3 तालुक्यांमधली 60 गावं पाणी नसल्याने मेटाकुटीला आली आहेत या गावांना पाणीपुरवढा करण्याची क्षमता असलेला हा धामणी मध्यम प्रकल्प गेल्या 18 वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे 60 गावांना पाणी नाही, त्यांची शेती सुकून जात आहे. गुरा-ढोरांनाही प्यायला पाणी कुठून आणायचं हा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला आहे.
सिंचन प्रकल्प रखडला
1996 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. 2000 साली कामाला सुरूवातही झाली पण नंतर काम जे रखडलं ते आजपर्यंत सुरूच झाले नाही. आता जोपर्यंत धामणी मध्यम प्रकल्पाचं काम प्रत्यक्षात सुरू होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 60 गावतल्या ग्रामस्थांनी घेतलाय.
इतक्या वर्षात निवेदनं देऊन झाली, आंदोलनं करून झाली, नेत्यांचे उंबरठेही झिजवून झाले पण काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे या गावातल्या ग्रामस्थांनी प्रचारासाठी उमेदवारांना गावात प्रवेशबंदीही केली आहे.
निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार फिरणारे नेते, गगनबावडा, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातल्या या 35 हजारांहून अधिक मतदारांसाठी धामणी मध्यम प्रकल्पाचं काम सुरू करून ते पूर्ण करणार का असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours