मुंबई, 23 मे : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विरूद्ध उर्मिला मातोंडकर या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण, विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उर्मिला मातोंडकर यांनी आव्हान दिलं आहे. ऊर्मिला मातोंडकर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मतदारांवर प्रभाव पाडू शकतात त्यामुळे या लढतीला महत्तव आहे.

आधी एकतर्फी,आता चुरस

उर्मिला मातोंडकर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मतदारांवर प्रभाव पाडू शकतात. यामुळे आधी एकतर्फी समजली जाणारी इथली लढत चुरशीची झाली आहे. शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना इथल्या अमराठी, गुजराथी मतदारांचा चांगला पाठिंबा आहे, असं म्हटलं जातं. मागच्या निवडणुकीत ते इथून चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते पण आता ते इथे त्यांची सत्ता राखतात का ते पाहावं लागेल.

वाहतूक प्रकल्प आणि प्रवाशांची सुरक्षा

दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, इशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान भाजपसमोर आहे.

राज ठाकरे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याचा फटका भाजपला किती बसेल हे निकालातच कळेल. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours