मुंबई :  मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर पायल तडवी यांनी रॅगिंगच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासोबतच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगानं मागितला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून 26 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरनं आत्महत्या करून आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील ही घटना आहे. पायल तडवी असं आत्महत्या करणाऱ्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरचं नाव आहे. पायल यांनी 22 मे रोजी रुग्णालयाच्या परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांनी जातीयवादी टीका करून पायलचं रॅगिंग केल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबीयांनी केला. याप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या तिघीही फरार आहेत.
प्राध्यपकांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
पायल तडवी यांची आई अबेदा तडवी यांनी केलेल्या आरोपानुसार,'रॅगिंगसंदर्भात पायलनं तिच्या प्राध्यापकांकडे तक्रारदेखील केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आत्महत्या करण्यापूर्वी पायलनं मला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास फोन करून तिचा प्रचंड प्रमाणात मानसिक छळ होत असल्याचं सांगितलं. यापूर्वीही तिनं याबाबतची तक्रार माझ्याकडे केली. तेव्हा मी स्वतः प्राध्यापकांच्या कानावर ही गोष्ट घालत या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली, पण याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं गेलं. मी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनाही भेटण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळाली नाही. अखेर तिनं आत्महत्या करून आयुष्य संपवलं. माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या'.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours