शिरूर, 1 मे : शिरुर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीनंतर राजकीय वाद टोकाला गेला आहे. फेसबुक पोस्टवरून झालेल्या वादाचं रुपांतर नंतर थेट हाणामारीत झालं आहे. यात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूराम दांगट व त्यांच्या पत्नीवर (सोमवारी) मध्यरात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे हा प्रकार घडला आहे. ही मारहाण शिवसेनेचे नेते आणि निरगूडसर गावचे माजी सरपंच रवींद्र वळसे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केली गेली, आहे असा आरोप काळूराम दांगट यांनी केला आहे. मात्र रवींद्र वळसे पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आम्हाला राजकीय क्षेत्रात बदनाम करण्यासाठीचं हे षडयंत्र आहे, असं रविंद्र वळसे सांगत आहेत.
या सगळ्या घटनेनंतर मंचर पोलीस स्थानकात दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मंगळवारी पहाटेपासून काळूराम दांगट मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दांगट यांना चार जखमा झाल्या असून, त्यांच्या मेंदूलाही इजा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सिटीस्कॅन व अन्य तपासण्या व उपचारासाठी त्यांना पुण्याला हलवण्यात आलं आहे. उपजिल्हा रुग्णालयात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी भेट देऊन दांगट व त्यांच्या पत्नीची विचारपूस केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours