मुंबई: मुंबईतल्या शिवडी भागात रविवारी एका भरधाव कारने 8 लोकांना चिरडले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. याप्रकरणी आर.के रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शाहबाज वाडी हे आपल्या पत्नीसह आपल्या कारने जात होते. जात असताना त्यांचं आपल्या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कारने दिशा सोडून दुसरीकडे वळण घेतलं. कार बाजूच्या बस स्टॉपकडे वळली आणि बसची वाट पाहात उभ्या असलेल्या माणसांना कारने चिरडले.
या अपघातात कार चालक शाहबाज आणि त्याची पत्नीही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
फुटपाथवर झोपलेल्या दोघांना चिरडलं
रस्त्यावर झोपलेल्या तीन जणांना टँकरनं चिरडल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुंबईतील विक्रोळी येथील ही दुर्घटना आहे. कैलास कॉम्प्लेक्स टिम्बकटु हॉटेलजवळ पादचारी मार्गावर झोपलेल्या तीन जणांना टँकरने चिरडलं. हे तिघं जण साखर झोपेत असल्यानं आपल्यावर मृत्यू ओढावत आहे, हे त्यांना समजण्यापूर्वीच काळानं घाला घातला. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे या दोन महिलांचा नाहक बळी गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री (8 जून) 9.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर पार्क करताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. याचवेळेस हा टँकर दुसऱ्या टँकरवर जाऊन आदळला. या घटनेत रस्त्यावर झोपलेली हे तिघं जण टँकरखाली चिरडले गेले. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours