मुंबई, 10 जून : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करताना शिवसेनेचं लक्ष हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवरही होतं. पण आता दिल्लीत झालेल्या भाजपच्या बैठकीनं शिवसेनेच्या महात्त्वाकांक्षेला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. कारण पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी भाजपनं रणशिंग फुंकलं आहे.

भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या कोअर टीमसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब केलं. पण त्याचवेळी भाजपचाच मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेशही दिले आहेत. ज्याप्रमाणे मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जागांचा विचार केला नाही, त्याच पद्धतीने राज्यात मुख्यमंत्री आपला असावा यासाठी शिवसेना आणि मित्र पक्षाच्या जागा कशा निवडून येतील यासाठी काम करा, असा आदेश शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या शिवसेनेला मात्र धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहावं लागेल.

आगामी विधानसभा निवडणूक आणि संघटनात्मक निवडणुकांबाबत अमित शहा यांच्यासोबत चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीपूर्वी जाताना सांगितलं. आम्ही सध्या विधानसभा  निवडणुकीच्या मोडमध्ये आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारही होणार आहे पण प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार आहे की नाही या संदर्भात केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बैठकीआधी अमित शहा यांनी  हरियाणा, झारखंड या राज्याच्या नेत्यांसोबतही बैठका घेत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours