मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळीच महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षासाठी असेल हे निश्चित झाले होते, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी स्पष्ट केले. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विटवरून शिवसेना-भाजपमध्ये प्रत्येकी अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे म्हटले होते. सरदेसाई यांच्या या ट्विटवरून राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. त्यावर आता शिवसेनेकडून देखील शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत जर पुन्हा युतीची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षासाठी असेल.
शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात निर्णय झाला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचा प्रत्येकी अडीच-अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री असेल. जे लोक हा फॉर्म्युला निश्चित करताना उपस्थित नव्हते त्यांनी स्वार्थासाठी युती तोडण्याचा प्रयत्न करु नये, असे सरदेसाई यांनी ट्विटवर म्हटले होते. सरदेसाई यांच्या या निर्णयावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण शिवसेनेच्या प्रवक्त्या कायंदे अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याला दुजोरा दिला आहे. राज्यातील युती सरकारमध्ये अडीच वर्षाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. यात कोणतीही नवी गोष्ट नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात यासंदर्भात निर्णय झाला होता. भाजप नेत्यांना याची माहिती आहे की नाही हे तेच सांगू शकतील, असेही कायंदे म्हणाल्या.
2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप केंद्रात व राज्यात सत्तेत एकत्र होते. 2014ची लोकसभा एकत्र लढल्यानंतर विधानसभा मात्र दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवल्या होत्या. त्यानंतर सत्तेत जरी असले तरी शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली होती. ही टीका अगदी पंतप्रधान मोदींवर देखील करण्यात आली होती. पण 2019च्या लोकसभेच्या आधी भाजपने जागा कमी होतील या शक्यतेने सर्व नाराज मित्र पक्षांना सोबत घेण्याचे ठरवले होते. लोकसभेसाठी जागा वाटप करताना शिवसेने विधानसभेसाठी देखील आताच जागा वाटप करण्याची अट ठेवली होती. त्यानुसार दोन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभेची जागा वापटाचे सूत्र निश्चित केले होते. आता यासंदर्भात नवी माहिती सरदेसाई यांच्या ट्विटमुळे समोर आली. सरदेसाई यांनी केलेले ट्विट बरोबर असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी सांगितले आहे. कायंदे यांनी म्हटल्या प्रमाणे दोन्ही पक्षांमध्ये असा फॉर्म्युला ठरला असेल तर 1999नंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours