मुंबई, 14 जून : बारामती-माढ्याच्या पाणीप्रश्नावरून वाद उफाळून आला आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीस मिळणारे पाणी आता माढ्याकडे वळवले गेले आहे. यावरून बारामती विरुद्ध माढा असा राजकीय रंग दिला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून महाराष्ट्रात तरी पाण्याचे राजकारण घडू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 'राजकीय सभ्यता पाळण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून माढा, सांगोला वगैरे भागासाठी वळविलेल्या पाण्याला बारामती विरुद्ध माढा असा रंग मिळणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घ्यायला हवी. निदान महाराष्ट्रात तरी पाण्याचे राजकारण घडू नये. निवडणुकांत पैशांचा पाऊस पडतो, पण निसर्ग कोपल्यामुळे तलाव, धरणे व जलशिवारांची डबकी होतात. तेव्हा जे पाणी निसर्गकृपेने मिळाले आहे ते सर्वांना न्याय्य पद्धतीने कसे मिळेल हे पाहायला हवे. पाण्याला कोणीच बाप नाही हे महत्त्वाचे', असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours