मुंबई, 20 जून : विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर या निवडणुकीची घोषणा करतील. त्यानंतर कामकाज होईपर्यंत निवडणुकीचा सोपस्कार पार पाडला जाणार आहे. उपसभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असून या पदासाठी शिवसेना नेत्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विधान परिषदेतील उपसभापतीपदाची ही निवडणूक चर्चेचा विषय होती. उपसभापतीपद सध्या रिक्त आहे. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घेण्यात यावी, यासाठी शिवसेना आणि भाजप युती आग्रही होती. आता अखेर ही निवडणूक होणार असून या पदासाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 
विधानपरिषदेत सभापतीपदाबाबतही हालचालींना वेग
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत जाण्याच्या चर्चा रंगत आहेत. पण अशातच रामराजेंना धक्का बसला आहे. कारण भाजपकडून रामराजे यांच्याविरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारकडून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बजेट सादर करण्यात आलं. यावेळी अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला. यात विधानपरिषदेत रामराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांत दुजाभाव केल्याचा आरोप भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आला. तसंच रामराजेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबतही भाष्य केलं.
भाजपने अविश्वास ठराव मांडल्यास रामराजे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक स्वराज्या संस्थांतील पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलं आहे. अशावेळी रामराजे यांना विधानपरिषद सभापती म्हणून आपलं पद कायम राखणं कठीण होऊ शकतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours