मुंबई, 20 जून : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील विस्तारावरून सरकारला चिमटे काढले. त्यानंतर राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले आणि नुकतेच मंत्री झालेले जयदत्त क्षीरसागर यांनी अजित पवार यांना इशारा दिला आहे.
शेतकरी प्रश्न आणि कथित अर्थसंकल्प फुटीवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. कॅबिनेट विस्तारात आयारामांना मिळालेल्या संधीवरून अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 'आम्हाला वाटलं होतं कोल्हापूरचे क्षीरसागर मंत्री होती, पण झाले बीडचे. निष्ठावंत शिवसैनिकांनी काय सतरंजा उचलायच्या काय?' असा खोचक सवाल करत अजित पवारांनी शिवसेनेवर टीका केली. या टीकेला जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलं आहे.
'अजितदादा तुम्हीच मला रेटत-रेटत इथपर्यंत आणलं. मी आधी तुमच्यासोबतच होतो, त्यामुळे मला सगळं माहिती आहे. ते उघडं करायला लावू नका,' असा इशारा क्षीरसागर यांनी अजित पवारांना दिला आहे.

विधानसभेत जोरदार खडाजंगी
पावसाळी अधिवेशनामध्ये गणितात जोडाक्षरं टाळण्यावरूनही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची तुफान फटकेबाजी केली. बावनकुळेंना 502कुळे असं म्हणायचं का? किंवा फडणवीसांना फडण20 असं म्हणायचं का? अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली.
दुसरीकडे, विधानपरिषेदत मुख्यमंत्री आणि अनिल परब आमने सामने आले. कल्याण डोंबिवलीतील कर बुडव्यांवर आणि त्यांना वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, करबुडव्यांना पाठीशी घातलं जातं आणि अधिकारी त्यांच्याकडून पैसे उकळतात अशा अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली जाते, असा आरोप अनिल परब यांनी केला. त्यावर, याबाबत पुन्हा एकदा तपास करू, सविस्तर चौकशी करु असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours