यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील मराठवाडाच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास तीन ते पाच सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, सावळीपासून एक किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी, आदी गावात भूकंपाचे धक्के जाणवले.
टीव्ही पाहणाऱ्या, बाहेर झोपलेल्या नागरिकांनी हे धक्के अनुभवले. टीव्हीवरील फ्लॉवर प्लॉट पडणे, घरातील भांडे पडणे, बंद पंखे हालणे, घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या. चिचबर्डी परिसर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. याच भागातील अंजनखेड, राणीधानोरा, गोंडवडसा, साकूर, कवठा बाजार, कोसदनी, अंबोडा इथं सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली.
पैनगंगा नदीच्या अलिकडील भागात हे धक्के जाणवले आहे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, मन्याळी, वडद, मुडाणा, बेलखेड या गावांनाही भूकंपाचं धक्के जाणवल्याचं तेथील नागरिकांनी सांगितलं. जिल्ह्याच्या मराठवाडा सीमेवरील बहुतांश तालुक्यातील गावांमध्ये हे धक्के जाणवले आहे. महागाव तालुक्यातील करंजखेड, कासारबेहळसह सहा गावांमध्येसुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, फुलसावगी, उमरखेड, भागात भूकंपाच सौम्य धक्का जाणवला. सर्वत्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर भूकंपाच्या धक्क्यांना घाबरून नागरिक रस्त्यावर आले आहेत. घटना घडताच यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी तहसिलदारांनापाहणीसाठी रवाना होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, माहूर, किनवट तालुक्यातील अनेक तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. हादऱ्यामुळे टेभीमध्ये भिंत कोसळी तर वानोळा, सारखनी, माडवी, परिसरात लोक रस्त्यावर आले आहेत.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात अफवांना उधाण आलं आहे. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. तर यावर आता भूगर्भ तज्ञाकडून तपासणीचं काम सुरू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours